भोसरी : लॉकडाऊनच्या कालावधीत चढ्या दराने दारू विकणाऱ्या दोघांवर भोसरी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 14 लाख रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. ही कारवाई नाशिक फाटा, कासारवाडी येथे करण्यात आली.
प्रकाश किंमतराम आसवानी (रा. पिंपरी), नामदेव डोंगरे (रा. काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक फाटा येथील फाल्कन बस लाईन्स प्रायव्हेट लिमिटेड येथे एक व्यक्ती विदेशी दारू चढ्या दराने विकत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. त्यात तब्बल 14 लाखांची विदेशी दारू पोलिसांच्या हाती लागली.
आरोपी नामदेव डोंगरे हा दारूची अवैधरित्या विक्री करत होता. लॉकडाऊन असल्याने तो चढ्या दराने विक्री करत होता. लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक झाल्यानंतर तो तीनपट दराने दारू विक्री करणार होता. ही दारू त्याचा साथीदार प्रकाश आसवानी याच्या मालकीची असून दोघेजण मिळून दारूविक्री करत असल्याने नामदेव याने पोलिसांना सांगितले. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.