मुंबई : राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडीवर मोठे संकट उभे ठाकले आहे. एकीकडे शिवसेना बंडखोरांना परत आणण्याची तयारी करत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. ३ दिवसांमध्ये १६० जीआर काढण्यात आल्याचे समोर आले आहे, राज्यपालांनी या जीआरची माहिती आता सरकारकडून मागवली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन सुरत व्हाया गुवाहाटी गाठले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे २२, २३ आणि २४ जून दरम्यान राज्य सरकारने १६० जीआर काढल्याचे समोर आले आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल १६० जीआर काढल्यामुळे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला होता. दरेकर यांनी याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांना पत्र पाठवले होते.
या पत्राची राज्यपालांनी दखल घेतली आहे. प्रवीण दरेकरांच्या पत्रावर कारवाई करत राज्यपालांनी राज्य सरकारकडून खुलासा मागितला आहे. राज्यपालांनी मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे २२,२३ आणि २४ जून दरम्यान घेतलेल्या निर्णयाबाबत खुलासा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. आता राज्य सरकार या निर्णयाबद्दल काय खुलासा करेल, हे पाहण्याचे ठरणार आहे.