मुंबई : आघाडीतील 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.ते माढा तालुक्यातील टेंभूर्णीत आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणं खिलाडूवृत्ती शिकावी असेही सामंत म्हणाले. यापुढं येणारे महापालिकेचं मैदान असो लोकसभेचे असो अथवा विधानसभेचे सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
बच्चू कडू यांच्या संपर्कात आघाडीमधील 10 ते 12 आमदार आहेत. तर 8 ते 10 आमदार माझ्या संपर्कात असल्यानं एकूण 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी टेंभूर्णीत केला. यापुढं येणारे महापालिकेचे मैदान असो लोकसभेचे असो अथवा विधानसभेचे सर्व कुस्त्या शिंदे फडणवीस जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टेंभुर्णीत शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे यांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळी सामंत यांच्यासह ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत उपस्थित होते.
टेंभूर्णीतील कुस्ती स्पर्धेसाठी पुणे, सातारा, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातील नामांकित मल्ल आले होते. या स्पर्धा पाहण्यासाठी जवळपास 25 हजार कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती. मात्र सामंत यांचे भाषण सुरू होताच वीज तोडणीवर बोला असा गोंधळ प्रेक्षकांनी सुरू केला. यावेळी पुरेशा दाबाने वीज पुरवठा केला जाईल असे उद्य सामंत यांनी सांगितले.
येत्या पंधरा दिवसांत महाविकास आघाडीतील 10 ते 15 आमदार भाजप, शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. कोर्टातील प्रलंबीत खटल्यामुळं पक्षप्रवेश लांबत असल्याचे कडू यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील सरकार पडण्याचे काहीही कारण नाही. सरकार बहुमतामध्ये आहे. म्हणजेच 20-25 आमदार इकडे तिकडे झाले तरी, काही फरक पडणार नाही. सरकार आपले कार्यकाळ पूर्ण करेल असेही कडू म्हणाले.