क्रिप्टोकरन्सीत 500 कोटींचा घोटाळा; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या चौकशीची मागणी

0

जालना : जिल्ह्यात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून 500 कोटींपेक्षा अधिक घोटाळा झाल्याचा आरोप करत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आपले जावई क्रिकेटपटू विजय झोल यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. पत्रकार परिषद घेत अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर पलटवार केला आहे.

अधिक पैशाचे अमिष दाखवून क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक झाली आहे. याचा मास्टरमाईड शोधला जावा अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी केली आहे. या प्रकरणी अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे देखील अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.

घोटाळेबाजांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या आमदार कैलास गोरंट्याल यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले. गोरंट्याल खोटे बोलत आहेत. फसवणूक झालेल्यांची बाजू न घेता ते फसवणूक करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. त्यांचे यात काय हितसंबंध आहेत? असा सवाल अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केला.

या प्रकरणी उद्योजक किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने तक्रारी दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विजय झोल यांनी गुंतवणूक केली. ज्यात या क्रिप्टो करन्सीचा मार्केट व्हॅल्यू घसरल्याने आपल्याला त्यात दोषी धरून क्रिकेटर विजय झोल आणि त्यांच्या भावाने घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार किरण खरात यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी क्रिकेटर विजय झोल आणि त्याचा भाऊ विक्रम झोल यांच्यासह 15 जणांवर घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेत किरण खरात यांना अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल व कंपनी गुंडांकरवी धमक्या देत आहेत. तसंच त्यांनी घर आणि काही प्लॉटची रजिस्ट्री आपल्या नावे करून घेतली असल्याचे आरोपही केले आहेत. या सर्व आरोपांना अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.