‘ब्रा’ अन् ‘अंतर्वस्त्रा’मध्ये ६२ लाखांचं सोनं!

0

बंगळुरु : बंगळुरु विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांना एका महिलेकडून तब्बल ६२ लाखांचं सोनं जप्त केलं आहे. या महिलेने तिच्या कस्टमाइज स्पोर्ट्स ब्रामधील पॅडिंगमध्ये १७.५ लाखांचं सोनं लपवलं होतं. तर या महिलेबरोबरच अन्य एका व्यक्तीने त्याच्या अंतर्वस्त्राच्या (अंडरपॅण्टच्या) इलॅस्टीकमध्ये तब्बल ४४.४ लाखांचं सोनं लपवल्याचं तपासामध्ये उघड झालं आहे. दोघांनाही केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

ही महिला दुबईवरुन आली होती तर पुरुष आबू धाबीवरुन आला होता. दोघांनाही कस्टमच्या अधिकाऱ्यांनी शंका वाटल्याने थांबवलं आणि सखोल तपासणी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. एअर इंटेलिजन्स युनिटच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरु विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी दुबईहून आलेल्या एमरिट्स एअरलाइन्सच्या ईके ५६४ या विमानातील महिला प्रवाशाविरोधात ही कारवाई केली आहे. हे विमान ८ ऑक्टोबर रोजी सकाळच्या वेळेस बंगळूरु विमानतळावर लॅण्ड झालं होतं. अटक करण्यात आलेली माहिला चालताना फारच अस्वस्थ वाटत होती. तिच्या चालीवरुन कस्टम अधिकाऱ्यांना शंका आली. तिला थांबवून चौकशी सुरु असतानाच या महिलेने परिधान केलेल्या ब्राबद्दल अधिकाऱ्यांना शंका आली. त्यानंतर महिला अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी या महिलेला ब्रा आणि अंतरवस्त्र काढून आमच्या ताब्यात द्यावीत असं सांगितलं.

या महिलेने दिलेल्या ब्राची तपासणी करताना कस्टम अधिकाऱ्यांनी ब्राचं पॅडिंग फाडलं. या ब्रामध्ये लावलेल्या पॅडिंगमधील कापसासारख्या वस्तूमध्ये सोन्याचे छोटे छोटे तुकडे दिसून आले. या तुकड्यांचं एकूण वजन ३४८ ग्राम इतकं भरलं. या सोन्याची किंमत १७ लाख ५३ हजार ६३० रुपये इतकी असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

तर अटक करण्यात आलेला पुरुष प्रवासी हा इतिहाद एअरवेजच्या ईव्हा २१६ विमानाने रविवारी पहाटे आला होता. या व्यक्तीला विमानातून उतरल्या उतरल्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. या व्यक्तीने त्याच्या कंबरेजवळ अंडरपॅण्टच्या इलॅस्टीकच्या पट्टीमध्ये सोन्याची पावडर आणली होती. या सोन्याचं वजन ८६६ ग्राम इतकं असून त्याची किंमत ४४ लाख ३७ हजार ४५३ रुपये इतकी आहे. दोघांविरोधातही सोनं तस्करी आणि कस्टमच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.