कोल्हापूर : आयकर अधिकारी असल्याचे भासवून सराफ व्यावसायिकाकडून भरचौकात लुटलेली 80 लाखांची रोकड ‘हवाला’ व्यवहारातील असल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे.
याप्रकरणी मुख्य सूत्रधार संजय आप्पासाहेब शिंदे ( 40, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) व सुकुमार ऊर्फ बबलू हंबीरराव चव्हाण (36, रा. निगवे दुमाला, ता. करवीर) यांच्यासह टोळीतील 7 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लुटारूंनी नेमकी किती रक्कम लुटली, याबाबत तपासाधिकारी अद्यापही संभ्रमावस्थेत आहेत.
टोळीतील शिंदे, चव्हाण या म्होरक्यांसह राहुल बाबुराव मोरबाळे (47, रा. जयभवानी गल्ली, हुपरी, ता. हातकणंगले), राहुल अशोक कांबळे (27, रा. निगवे दुमाला, ता. करवीर), पोपट सर्जेराव चव्हाण (रा. निगवे दुमाला, ता. करवीर), जगतमान बहाद्दूर सावंत (22, रा. मूळ गाव लकमी कैलाली, बहुनिया, नेपाळ, सध्या गांधीनगर, ता. करवीर), रमेश करण सोनार (25, रा. बहुनिया, नेपाळ, सध्या गांधीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फरारी संशयित चैनय्या नरसिम्मू दमू (रा. सांगली) व विशाल पवार (रा. सातारा) यांना अटक करण्यात पथकाला लवकरच यश येईल, असे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले. संशयितांकडून 17 लाख 60 हजार रुपयांसह मोपेड व दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. टोळीला व्यापारी संतोष कुकरेजा (रा. गांधीनगर) यांच्या दुकानातील कामगार जगतमान सावंत व रमेश सोनार यांनी ‘टिप’ दिल्याचेही तपासात पुढे आले आहे.
गांधीनगर येथील संतोष कुकरेजा यांच्याकडे आर्थिक व्यवहाराची जबाबदारी सांभाळणारा धनाजी आनंदा मगर (रा. नागाव, ता. वाळवा, जि. सांगली) हा सराफी व्यावसायिक म्हणूनही परिचित आहे. बुधवारी (दि. 19 ऑक्टोबर) रात्री उशिरा तो 80 लाखांची रोकड घेऊन गांधीनगर येथून कोल्हापूरकडे येत असताना टोळीने त्याचा पाठलाग केला. रूईकर कॉलनी परिसरातील मुक्तसैनिक वसाहत सिग्नलजवळ संशयितांनी मगरला रोखले. अधिकारी असल्याचे सांगून त्यास महामार्गावरील सांगली फाट्यावर नेण्यात आले. तेथे त्याच्यासह मोपेडची झडती घेण्यात आली. दोन कापडी पिशव्यांतील अनुक्रमे 50 लाख व 30 लाख अशी एकूण 80 लाख 13 हजारांची रोकड हिसकावून लुटारूंनी पलायन केले.
सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य माहितीच्या आधारे पोलिसांनी टोळीसह साथीदारांचा छडा लावून चार दिवसांपूर्वी संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मोठी रक्कमही हाताला लागली होती. मात्र, टोळीने नेमकी किती रक्कम लुटली तसेच संबंधित रक्कम कोणत्या व्यवहारातील होती, हे स्पष्ट झाले नव्हते.
टोळीचा म्होरक्या संजय शिंदे याचे गांधीनगर येथे फुटवेअरचे दुकान असून, व्यापारी संतोष कुकरेजा यांच्या आर्थिक व्यवहाराची त्याला माहिती होती. हवाला उलाढालीमध्ये कुकरेजा सक्रिय असल्याची बातमी मिळाल्याने त्यांना लुटण्याचा टोळीने बेत रचला होता. हुपरी येथील चांदी व्यावसायिक राहुल मोरबाळे याच्या दुकानात साथीदारांनी लुटीचा कट रचला होता. या कटात कुकरेजा यांच्या दोन्ही कामगारांनाही सहभागी करून घेण्यात आले होते, असेही तपासाधिकारी संजय गोर्ले यांनी सांगितले.
बुधवारी (दि. 19 ऑक्टोबर) रात्री धनाजी मगर हा हवाला व्यवहारातील मोठी रक्कम घेऊन मोपेडवरून गांधीनगर येथून कोल्हापूरकडे जाणार असल्याची ‘टिप’ जगतमान सावंत व रमेश सोनार यांनी संजय शिंदे, सुकुमार चव्हाण यांना मोबाईलवरून दिली. त्यानुसार टोळीने लुटीचा प्लॅन रचला. दुचाकी व मोपेडवरून चौघांनी मगरचा गांधीनगर येथून पाठलाग सुरू केला. रूईकर कॉलनीजवळ सिग्नल चौकात त्यास रोखले.
मगरला चौकात रोखल्यानंतर संशयित राहुल मोरबाळे याने स्वत: आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून टोळीने त्यास सांगली फाट्याजवळ नेले. तेथे झडती घेतली. मोपेडच्या डिकीतील 80 लाख 13 हजारांची रक्कम घेऊन संशयित पसार झाले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी टोळीतील 9 जणांनी आपापसात रक्कम वाटून घेतली होती, अशीही माहिती चौकशीत उघडकीला आली आहे, असेही गोर्ले यांनी सांगितले.
मुख्य सूत्रधाराला अटक करून त्याच्याकडून 17 लाख 60 हजारांची रोकड असेच अन्य मुद्देमाल असा 19 लाख 26 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. सुकुमार चव्हाण याच्याकडून 6 लाख 50 हजार, संजय शिंदे (2 लाख), राहुल मोरबाळे (3 लाख), राहुल कांबळे (1 लाख 50 हजार), पोपट चव्हाण (1 लाख 50 हजार), टिप देणारा जगतमान सावंत (2 लाख), रमेश सोनारकडून 2 लाख रुपये हस्तगत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अन्य दोन संशयित प्रत्येकी 4 लाखांच्या रकमेसह फरार झाले आहेत.