औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 700 जणांची प्रकृती बिघडली. पण सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्यामुळे सर्वजण बचावले. या सर्वांवर औरंगाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेरचा लग्नसोहळा बुधवारी 4 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुलीकडच्यांनी आलेल्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मेजवानी ठेवली होती. मात्र यावेळी लग्नात बनवण्यात आलेल्या स्वयंपाकातून लोकांना विषबाधा झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांच्या मुलाचा विवाह 4 जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. विवाहात पाहुण्यांसाठी मेजवानी देण्यात आली होती. जेवणानंतर सर्वांनी गोड पदार्थाचे सेवन केले. हा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळेतच पाहुण्यांना उलट्या व मळमळीचा त्रास जाणवू लागला. काही पाहुणे स्वतहून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
कुणाला पोटाचा त्रास होऊ लागला तर कुणाला मळमळ होऊ लागली. जवळपास 400 ते 500 नागरिकांना एकाच वेळेस घाटी रुग्णालय व एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले. यामध्ये महिला, लहान मुलांचा देखील मोठचा प्रमाणात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत आम्ही कदीर मौलाना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.