मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने स्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळले आहेत. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे.
देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, कोरियन कार उत्पादक कंपनी किआ कॉर्पोरेशनने त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. या कारने कोरियन मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर आता या कारला युरोपियन बाजारातही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
किआ कॉर्पोरेशनने माहिती दिली आहे की, ग्राहक त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारला चांगली पसंती दर्शवत आहेत. कंपनीला युरोपमध्ये प्री-सेलच्या जबरदस्त ऑर्डर्स मिळत आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या इलेक्ट्रिक वाहनाला ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इतर मोठ्या देशांकडून 7000 युनिट्सच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे.
किआने गेल्या महिन्यात दक्षिण कोरियामधील एका डेडिकेटेड प्लॅटफॉर्मवर त्यांची ही क्रॉसओव्हर ईव्ही लाँच केली होती. या कारला लाँचिंगच्या दिवशीच 21,016 प्री-ऑर्डर्स मिळाल्या. एवढ्या मोठ्या ऑर्डरमुळे कंपनीने एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. हा विक्रम कंपनीने त्यांच्या देशांतर्गत बाजारात प्रस्थापित केला होता. आता या कारचा जलवा युरोपातदेखील पाहायला मिळत आहे.
किआ ईव्ही 6 इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (ई-जीएमपी) वर आधारित आहे, हा प्लॅटफॉर्म विशेषत: इलेक्ट्रिक वाहनांसाठी विकसित केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की आगामी काळात या प्लॅटफॉर्मचा इतर मॉडेल्समध्येही विस्तार होईल. 2026 पर्यंत 7 इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करण्याची किआची योजना आहे. ईव्ही 6 या ऑर्डरमधील पहिले मॉडेल आहे.
Kia EV6 मध्ये 800 व्होल्टची चार्जिंग सिस्टम मिळेल, ज्याच्या मदतीने केवळ 18 मिनिटांत ही कार 10 वरुन 80 टक्क्यापर्यंत चार्ज केली जाऊ शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार केवळ 4.30 मिनिटं चार्ज केली तरी ही कार किमान 100 किलोमीटरपर्यंत धावते. तर या कारची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 510 किलोमीटरची रेंज देते. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही EV6, EV6 GT-Line आणि EV6 GT सह तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. ही कार EV6 टू-व्हील ड्राइव्ह (2WD) आणि ऑल व्हील ड्राइव्हसह (AWS) सादर करण्यात आली आहे.