मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला आणि सुरक्षेला प्राधान्य देत असल्याचं सांगत केंद्र सरकराने CBSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांचं काय होणार? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय जाहीर होताच राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. “राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता असून यासंदर्भातला निर्णय लवकरच घेतला जाईल”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही विद्यार्थी-पालकांच्या मते परीक्षा घ्यायला हव्यात, तर काहींच्या मते परीक्षा रद्द करणं हा योग्य निर्णय आहे. या पार्श्वभूमीवर आता बारावीच्या परीक्षांसंदर्भात राज्य सरकार कोणता निर्णय घेतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आता केंद्र सरकारने देखील सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यावर बोलताना वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
“मला माहिती आहे की ही असाधारण परिस्थिती आहे. या काळात विद्यार्थ्यांना दुहेरी लढा द्यावा लागतो आहे. एका बाजूला ते करोनाशी लढा देत असताना दुसरीकडे त्यांना अभ्यास करावा लागतो आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण आहे. बारावीचं वर्ष हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाता महत्त्वाचा टप्पा आहे. मोलाची पायरी आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासन बारावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेणार आहे. राज्य सरकारची प्राथमिकता ही विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षिततेला आहे”, असं त्या म्हणाल्या.