बालकांच्या संरक्षणासाठी ‘मिशन नियमित लसीकरण मोहीम’

0

पिंपरी

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने क्षयरोग, पोलिओ, गोवर – रुबेला, घटसर्प, डांग्या खोकला, टिटॅनस, हिमोफिल्स इन्फ्ल्यूएंझा टाइप बी, अशा आजारांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी ‘मिशन नियमित लसीकरण मोहीम’ राबविण्यात येत आहे.

सद्यःस्थितीत बालकांमधील आजारपण व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण लसीकरण किमान ९० टक्के करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. या मोहिमेमध्ये अतिजोखमीचे क्षेत्र आणि अतिजोखीमग्रस्त लाभार्थी (पल्स पोलिओनुसार) यांची निवड केली जाईल. लसीकरण पथकात एक वैद्यकीय अधिकारी, दोन नर्स, दोन आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचा समावेश असेल.

स्थलांतरित होणाऱ्या झोपडपट्टया, बांधकाम ठिकाणे, पालावर, वीटभट्टया, स्थलांतरित, नियमित लसीकरण सत्र न घेतलेले क्षेत्र, ग्रामीण भाग येथील नियमित लसीकरणापासून सुटलेले किंवा वंचित राहिलेले, लसीकरणास नकार दिलेला अशा नवजात बालकांचा शोध घेण्यात येईल. तसेच, गेल्या तीन वर्षांत गोवर आणि इतर लसीकरणाने टाळता येणारे आजारांचे उद्रेक झालेली ठिकाणे, उपेक्षित घटकांचा समावेश आहे. मध्यम स्तरात झोपडपट्टीसदृश चाळी आणि उच्चस्तरात हौसिंग सोसायट्यांचा समावेश आहे.

अशी असेल मोहीम
१) १ ते ७ जून : नर्स, आशा, अंगणवाडी सेविकांमार्फत लाभाथ्र्यांची गणना
२) ९ जून ते २२ जून : लाभार्थी यादी तयार करणे, संख्या निश्चित करणे, रुग्णालय झोननिहाय लसीकरण सत्रांचे नियोजन
३) लसीकरण सत्राची वेळ : सकाळी ९ ते दुपारी ४

मोहिमेचा उद्देश
१) शून्य ते दोन वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थी व गर्भवती महिलांचा लसीकरण करणे
२) ‘झिरो डोस’ पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करणे
३) कोरोना काळात लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या बालकांचे लसीकरण
४) लसीकरणास नकार देणाऱ्या कुटुंबातील व समाजातील बालकांचे लसीकरण
५) महापालिका कार्यक्षेत्रात ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण लसीकरणाचे काम जलदगतीने वाढविणे

Leave A Reply

Your email address will not be published.