नवी दिल्ली : जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरमध्ये कर्करोगाला कारणीभूत असलेला अॅस्बेस्टॉस हा घटक असल्याचा दावा करणाऱ्या महिलांना 2.1 अब्ज डॉलर अर्थात 14 हजार 500 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देणं आता बंधनकारक झालं आहे. कारण या संदर्भात कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निर्णयावर पुन्हा सुनावणी करण्यास अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने मंगळवारी (एक जून) नकार दिला आहे. त्यामुळे जवळपास 10 वर्षं चाललेल्या या खटल्याचा निकाल ग्राहकांच्या बाजूने लागला आहे.
‘अमर उजाला’ने, तसंच ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
मिसौरीच्या कनिष्ठ न्यायालयात आपल्याला आपली बाजू योग्य पद्धतीने मांडता आली नाही, असं सांगून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने सुप्रीम कोर्टात खटला दाखल केला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने फेरविचार करण्यास नकार दिला. कनिष्ठ न्यायालयाने सुरुवातीला 400 कोटी रुपयांचा दंड कंपनीला ठोठावला होता. हे प्रकरण हायकोर्टात गेल्यावर हायकोर्टाने तो निम्म्यावर आणला. तो आता कायम राहणार आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन ही अमेरिकेतली बडी बहुराष्ट्रीय कंपनी असून बेबी पावडर हे तिच्या उत्पादनांमधलं प्रमुख उत्पादन होतं. या बेबी पावडरमध्ये कॅन्सरला कारणीभूत असलेला अॅस्बेस्टॉस हा घटक असल्याची तक्रार करण्यात आली होती. एकूण 22 महिलांनी या कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यापैकी पाच महिला मिसौरी राज्यातल्या, तर 17 महिला अन्य राज्यांतल्या आहेत. या कंपनीच्या बेबी पावडरचा वापर केल्यामुळे काही जणांचा मृत्यूही झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. एवढंच नव्हे, तर कंपनीच्या उत्पादनांमुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो, असा दावा करणाऱ्या महिलांकडून संपूर्ण अमेरिकेत जवळपास 9000 खटले जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर दाखल करण्यात आले आहेत.
अशाच एका प्रकरणात कंपनीला एक कोटी डॉलरची नुकसानभरपाई यापूर्वीही द्यावी लागली होती. 2016मध्येही एका ग्राहकाला कर्करोग झाल्यामुळे 5.5 कोटी डॉलर रुपये कंपनीला नुकसानभरपाईच्या रूपात द्यावे लागले होते.
जॉन्सन अँड जॉन्सनची पावडर सुरक्षित आहे, असा दावा कंपनीतर्फे वारंवार केला जात होता; मात्र नंतर या पावडरचं उत्पादन कंपनीतर्फे थांबवण्यात आलं होतं. अमेरिका आणि कॅनडात घटलेली मागणी, तसंच बाजारात नकारात्मक प्रसिद्धी झाल्याचं कारण कंपनीने त्यासाठी दिलं होतं.
पीडित महिलांचे वकील मार्क लेनियर यांनी सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. ‘तुम्ही कितीही श्रीमंत असा, शक्तिशाली असा, पण तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाहीत. कायदा सर्वांसाठी समान असतो. तुमच्यामुळे लोकांचं नुकसान होत असेल, तर कायद्याची व्यवस्था तुम्हाला दोषी ठरवतेच,’ असं त्यांनी म्हटलं आहे.