सोलापूर : Facebook ने Instagram मधील एक बग शोधण्यासाठी एका 21 वर्षीय भारतीय विकासकाला 30, 000 हजार डॉलर्सचे बक्षीस दिले आहे. भारतीय चलनात या रक्कमेचे मूल्य 22 लाख रुपयांच्या जवळपास आहे. मयूर फरतडे असे या विकासकाचे नाव आहे. त्याने फेसबुकच्या प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राममध्ये एक मोठी त्रुटी शोधून काढली आहे. या बगचा वापर करून कोणीही इन्स्टाग्रामवर कोणाच्याही खाजगी खात्यात डोकावू शकत होते. त्यामुळे फेसबुकने ही चुक सुधारली आहे.
मयूर हा महाराष्ट्रातील सोलापूरचा राहणारा असून तो संगणक शास्त्राचा विद्यार्थी आहे. याबाबत मयूरने Medium वर एक ब्लॉग पोस्ट करून याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून या त्रुटीची माहिती 16 एप्रिलला दिली होती. कंपनीने 15 जूनपर्यंत ही चूक सुधारली आहे. मयूरने दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इंस्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता.
मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खाजगी अन् अर्काइव्ह केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि IGTV व्हिडीओज पाहता येत होते. तसेच या पोस्टवरील लाईक्स, कमेंट्स, सेव्ह काउन्ट इतर माहिती देखील पाहता येत होती. विशेष म्हणजे, असे करण्यासाठी त्या युजरला फॉलो करण्याची गरज नव्हती.