लंडन : ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हॅन्कॉक आपल्या एका महिला सहकाऱ्याला किस करताना दिसले होते. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला होता.
हॅन्कॉक यांच्यावर कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला गेला होता. हा वाद समोर येताच ब्रिटनचं बोरिस जॉन्सन सरकार बॅकफूटवर आलं होतं. मॅट यांचा राजीनामा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वीकारला आहे.
यासोबतच त्यांनी म्हटलं, की केवळ कोरोना महामारीच्या काळातच नाही तर त्याआधीही तुम्ही जे काही करून दाखवलं, त्याचा अभिमान सोबत ठेवून तुम्ही पद सोडायला हवं.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, 42 वर्षीय हॅन्कॉक यांनी जॉन्सन यांना दिलेल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं, की आपण महामारीविरोधात लढण्यासाठी एका देशाच्या रूपात मोठी मेहनत केली आहे. हॅन्कॉक यांचं जिना कोलाडांगेलो यांच्याशी सिक्रेट अफेअर आहे.
ब्रिटनच्या द सन वृत्तपत्रानं हॅन्कॉक आणि जिना कोलाडांगेलो यांचे किस करतानाचे फोटो प्रकाशित केल्यानंतर मॅट यांनी राजीनामा दिला आहे. हॅन्कॉक मागील महिन्यात आपल्या ऑफिसमध्येच एका सहकाऱ्याला मिठी मारताना दिसले होते. सुरुवातीला त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता आणि म्हटलं होतं, की हे प्रकरण आता संपलं आहे. त्यांनी माफीदेखील मागितली होती.