नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची भीती वर्तवण्यात येत आहे. आगामी तिसऱ्या लाटेमागील भितीचं खरं कारण आहे कोरोनाचा नवा व्हेरिअंट, डेल्टा प्लस व्हायरस.
जगभरातील अनेक देशांमधील शास्त्रज्ञ या व्हेरिअंटबाबत चिंता व्यक्त करत असून तिसरी लाट येण्याचं मुख्य कारण कोरोना व्हायरसचा बदललेला अवतारच असू शकतो, असं बहुतांश शास्त्रज्ञांचं मत आहे.
11 जून या दिवशी डेल्टा प्लस व्हेरिअंटची पहिल्यांदा अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत जगातील अनेक देशांत हा व्हेरिअंट पोहोचला असून भारतातील 12 राज्यांमध्ये आतापर्यंत 51 रुग्णांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत
डेल्टा प्लस हा व्हेरिअंट डेल्टाच्या तुलनेत अधिक वेगाने पसरतो की नाही, याबाबत अद्याप कुठलंच ठोस संशोधन पुढं आलेलं नाही. मात्र हा व्हेरिअंट फुफ्फुसांना लवकर चिकटतो आणि त्याच्यावर परिणाम करायला सुरुवात करतो, असं सांगितलं जात आहे.
फुफ्फुसांवर परिणाम करण्याचा त्याचा वेग अधिक असेल, एवढंच आतापर्यंत सिद्ध होत असून याचा अर्थ तो जास्त नुकसान करणारा असेल किंवा अधिक वेगाने एकाकडून दुसऱ्याकडे पसरणारा असेल की नाही याबाबत मात्र संशोधन सुरु आहे.