पणदेरी धरण फुटण्याची शक्यता; एनडीआरएफ टीम दाखल

0

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरण फुटण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा पोलीस नियंत्रण विभागाला मिळताच पोलीस विभाग अलर्ट झाला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग मदतीच्या आवश्यक साहित्यासह आपल्या १०० पोलीस अंमलदारांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांना धीर दिला आहे.

जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला पणदेरी धरण फुटण्याची शक्यता असल्याची माहिती प्राप्त झाली. ही माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आपल्या पोलीस अंमलदारांना सूचना केल्या. गळतीमुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून डॉ. गर्ग यांनी सहकाऱ्यांसह पणदेरीला धाव घेतली.

पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथून जादा कुमक म्हणून १०० पोलीस अंमलदार रवाना झाले. तसेच आपत्कालीन साधन सामग्री, फायबर बोट, लाईफ जॅकेट, रिंग बोये, रोप, सर्च लाईट, स्ट्रेचर, प्रथमोपचार पेटी इत्यादी साहित्य तत्काळ पोहोचविण्यात आले. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नागरिकांना धरण फुटून कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून पी. ए. सिस्टीम व मेगाफोनव्दारे स्थलांतरीत होण्याबाबत आवाहन करण्यात आले.

स्थलांतरित होण्याकरिता निर्माण होणाऱ्या अडचणी समजून घेऊन जास्तीत जास्त लोकांना स्थलांतरित होण्याबाबत सांगण्यात आले. बौध्दवाडी, रोहिदासवाडी, कोंडगाव इत्यादी वाडीतील लोकांना महसूल व पोलीस प्रशासनाच्या मदतीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याकरिता मदत करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.