सोलापूर : साडेसात लाखांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार यालाही अटक करण्यात आली आहे.
संपत पवार येत्या ४ महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होता. तक्रारदारावर मुरुम चोरी प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात जप्त केलेली वाहने सोडावीत, तसे गुन्ह्यात मदत व सहकार्य करावे, यासाठी संपत पवार व रोहन खंडागळे यांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी करताना तडजोडीअंती ती रक्कम साडेसात लाखांवर आली. ही साडेसात लाख रुपये स्वीकारण्यासाठी एपीआय खंडागळे पुणे रोडवरील एका ठिकाणी थांबले होते.
मोबाईलवरुन संपत पवारही संर्पकात होते. जुना पूना नाका परिसरात तक्रारदाराकडून साडेसात लाख रुपये स्वीकारताना खंडागळे यांना पकडण्यात आले. त्याचबरोबर संपत पवार यांनाही पकडण्यात आले.
पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कविता मुसळे व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली.