‘या’ पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने जारी केला रेड अलर्ट

0
पुणे : राज्यात आठवड्यापासून ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावत जोर कायम ठेवला आहे. पुण्यासह घाट परिसरात आणि कोकण किनारपट्टीवर तर पावसाने धुमशान घातले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, जालना, परभणी आणि नांदेड या सात जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या सात जिल्ह्यांत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्‍यता आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारा वाहणार आहे.
राज्याची पश्‍चिम किनारपट्टी आणि घाट परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने नुकत्याच जारी केलेल्या सॅटेलाइट इमेजनुसार, कोकण किनारपट्टी, घाट परिसर, मुंबई, ठाणे, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांत ढगांनी मोठ्या प्रमाणात दाटी केली आहे.
यानंतर उद्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. 18 जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होत असला, तरी काही राज्यात मात्र जोरदार पावसाची शक्‍यता आहे.
दरम्यान, जून महिन्याच्या उत्तर्धात राज्यात मान्सूनने दीर्घ ब्रेक घेतला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात राज्यात पुन्हा मान्सूनने वापसी केली असून सध्या मान्सूनने संपूर्ण देशात मजल मारली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.