पुणे : जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथे शुक्रवारी (दि. 16 ) रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुणे -पंढरपुर पालखी मार्गावरील एका दुकानासमोर गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात नीरा येथील कुप्रसिद्ध गुंड गणेश रासकर (35, रा. निरा स्टेशन मस्जिद जवळ) याचा खात्मा झाला आहे.
गुंड गणेश रासकरची गेम झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली आहे. गौरव लखडे आणि निखील डावरे (रा. फलटण, जि. सातारा) यांनी गावठी पिस्तुलातून गुंड गणेश रासकर याच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी लखडे आणि डावरे याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नीरा येथील पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावरील एस.टी.स्टँड नजीक गुंड गणेश विठ्ठल रासकर हा पल्सर गाडीवर आला होता. त्याच्यावर पाठीमागून गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या डोक्याच्या मागच्या भागात खोलवर जखम झाली आहे. त्याला प्रथम नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचारापूर्वीच जखमी रासकार मृत झाल्याचे सांगितले.
घटनास्थळी पुणे ग्रामीणच्या बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आणि नीरा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस व जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनिल महाडीक यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.