‘शिवसेना, राष्ट्रवादी सोबत काँग्रेसही सत्तेत आहे; लक्षात असू द्या’

0
मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेनेही उत्तर दिले. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. ‘काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात, याचा तसा विसर पडत नाही म्हणा, पण आठवण दिलेली बरी’ असं खोचक वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केलं आहे.
‘खासदार अमोल कोल्हे म्हणतात पवार साहेबांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शिवसेना म्हणते आमच्या सहकार्याने राष्ट्रवादी सत्तेत, पण कृपा करुन दोन्ही पक्षांना याचा विसर पडू देऊ नका, काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात. तसा विसर पडत नाही म्हणा, पण आठवण दिलेली बरी’ असं ट्वीट डॉ. राजू वाघमारे यांनी केलं आहे.
‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत. लॉकडाऊनमुळे कार्यक्रम होत नव्हते म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचं होतं. राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे. मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण शिरूर मतदार संघातही अनुभवतोय. दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळत आहे. वयस्कर नेत्याने असं पोरकटपणाने वागणं याचं मला आश्चर्य वाटतं’ असं खासदार अमोल कोल्हे शिरुरमध्ये बोलले होते. त्यांचा रोख शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे होता.
‘अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात, तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले, आपण ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले. अंगापेक्षा पोंगा जास्त झाला की होते असे, अहो कोल्हे, ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरु नका’ असा सल्लाही शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी दिला.
Leave A Reply

Your email address will not be published.