मुंबई : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शुक्रवारी देखील जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून 23 जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून शुक्रवारी देखील मुंबईत जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे.
कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात महापूर आला असून चहूबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढल्याने चिपळूणची अवस्था भीषण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, संगमेश्वर, राजापूर ही शहरेही पुराच्या विळख्यात अडकली आहेत.