मुंबई : ऑलिम्पकमध्ये भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राने रोमांचक विजय मिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. एकवेळ मनिका स्पर्धेतून बाहेर जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण तिने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत सामन्यात कमबॅक केलं. आणि सामना जिंकलाही. मनिकाच्या या जोरदार कामगिरीमुळे महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही भारावून गेला आहे.
मनिकाच्या विजयानंतर सचिनने ट्विट करत तिचं कौतुक तर केलंच शिवाय तिचा आत्मविश्वासही वाढवला. सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘किती शानदार पुनरागमन केलं मनिका! तुझा प्रत्येक गुण पाहिला. सुरवातीला मार्गारेटानं वर्चस्व राखलं होतं, आपल्या बॅकहँडने तिने चांगला खेळ केला. पण मनिकाने हळूहळू सामन्यावर नियंत्रण आणण्यास सुरवात केली. आणि ते मिळवलंही.’
सचिनने पुढे म्हटले आहे की, ‘मनिकाने प्लॅन ए मधून प्लॅन बीमध्ये अत्यंत हुशारीने तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला चुका करण्यास भाग पाडलं. आणि युक्रेनियन खेळाडू मनिकाच्या प्लॅननुसार खेळू लागली. शानदार नियोजन करत मनिकाने मार्गारेटाला हरवलं. सामना पलटवण्यासाठी तिला परिस्थितीचं असलेलं भान जबरदस्त होतं.’
सेहवाग म्हणाला की, ‘शानदार कमबॅक मनिका, खूप खूप शुभेच्छा. पदकापासून फक्त एक पाऊल दूर!’ यासह युसूफ पठाण, हरभजन सिंग, कुस्तीपटू योगेश्वर दत्त, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, व्यंकटेश प्रसाद, मोहम्मद कैफ यांनीही मनिकाचं कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
जागतिक क्रमवारीत 62व्या क्रमांकावर असलेल्या मनिकाने 20व्या मानांकित मार्गारेटा पेसोत्सकाला चांगलेच झुंजवले. 57 मिनिटे चाललेल्या या सामन्यात तिने 4-3 (4-11, 4-11, 11-7, 12-10, 8-11, 11-5 आणि 11-7) असा विजय मिळवला. तिसऱ्या फेरीत तिचा सामना ऑस्ट्रियाच्या सोफिया पोलकानोवाशी होणार आहे.
जेव्हा जेव्हा मनिका मागे पडतेय अस वाटत होतं तेव्हा तिने आपल्या शॉटवर चांगले नियंत्रण राखलं. पहिले दोन सेट गमावल्यानंतर मनिका तिसऱ्या सेटमध्येही पिछाडीवर होती. पण त्यानंतर तिने खेळ बदलला. चौथ्या सेटमध्येही मनिकाने 6-4 अशी आघाडीही गमावली. त्यानंतर बरोबरी साधत राहिले, पण गेम पॉईंटवर मनिकाने हा सामना 2-2ने बरोबरीत रोखला. पाचव्या सेटमध्ये बरोबरीनंतर पेसोत्सकाने आघाडी घेत सेट आपल्या नावावर केला.
सहाव्या सेटमध्येही मनिका 2-5ने पिछाडीवर होती, पण तिने सलग नऊ गुण मिळवत 3-3 अशी बरोबरी साधली. त्यानंतर निर्णायक सेटमध्ये मनिकाने जोरदार फटके लगावले. युक्रेनियन खेळाडूकडे तिच्या फटक्यांना उत्तर नव्हते. फोरहँड स्मॅश लगावत तिने सामना जिंकला.