मुंबई : राज्यात पुन्हा अस्मानी संकट उभे ठाकले असून पुढील चार दिवस धोक्याचे आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघरसह पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये 2 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीसह पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. हवामान खात्याने या जिह्यांना येलो व ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तसेच कोकणातील सर्व गावांना अधिक सतर्कता राखण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या आठवडय़ात मुसळधार पावसाने कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर आदी जिह्यांमध्ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण केली. नैसर्गिक दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले. गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर थोडा कमी झाल्यामुळे काही भागांतील पूरपरिस्थिती हळूहळू ओसरली आहे. त्या संकटातून नागरिक सुटकेचा निःश्वास सोडतात तोच पुन्हा अतिवृष्टीच्या संकटाने धडकी भरवली आहे.
भारतीय हवामानशास्त्र्ा विभागाने (आयएमडी) राज्यात पुन्हा अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण होणार असल्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी कृष्णानंद होशाळीकर यांनीही गुरुवारी यासंदर्भात ट्विट केले. गुरुवारपासूनच कोकणासह नगर, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, बीड, परभणी, लातूर आणि धाराशीव आदी जिह्यांमध्ये मुसळधार पावसाने धुमशान घालण्यास सुरुवात केली आहे. 2 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर आणखी वाढून अतिवृष्टी होईल. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी, असे आवाहन करीत हवामान खात्याने काही जिह्यांना येलो अॅलर्ट आणि काही जिह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे.
पुढील 48 तासांत काही जिह्यांत पावसाचा जोर वाढेल. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागेल. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर येथे ऑरेंज अॅलर्ट. तसेच पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिह्यांसाठी येलो अॅलर्ट.
पुणे, सातारा जिह्यांत पुढील तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता. कोल्हापुरातही अतिवृष्टीच्या शक्यतेने अनेक गावांना सतर्कतेचा इशारा.