काबूल : अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे ठरवले आहे. गेली सहा महिन्यात होत असलेल्या दहशतवादी कारवाई मुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेली 24 तासात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ३०० हून अधिक दहशतवादी मारले गेले तर १२५ हून अधिक जखमी झाले आहेत. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान नॅशनल सिक्युरिटी फोर्स (एएनएसएफ) ने नांगरहार, लगमन, गझनी, पक्तिका, कंदाहार, जाबूल, हेरत, जोजजान, समांगन, फरयाब, सर ए पोल, हेलमंद, निमरूज, बगलान आणि कपिसा प्रांतात जोरदार कारवाई केली. कंदाहारच्या परिसरात अफगाणिस्तानच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात १६ तालिबानी दहशतवादी मारले गेले तर दहा जखमी झाले.
हवाई दलाच्या विमानांनी काल बल्ख प्रांतात देहदादी जिल्ह्यात देखील कारवाई केली. या हल्ल्यात दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ववस्त करण्यात आले. यासंदर्भात अफगाणिस्तानच्या मंत्रालयाने हवाई हल्ल्याचे दोन व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. बागलान प्रांतात सुरक्षा दलाने तालिबानचे २३ दहशतवादी मारले आणि त्यात चार जखमी झाले आहे. त्यांचा शस्त्रसाठाही नष्ट करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी जाबुल परिसरात हवाई दलाने अफगाणिस्तान सैनिकांच्या मदतीने ६० दहशतवादी ठार केले आणि यात ११ जण जखमी झाले.
लॉंग वॉर जर्नलच्या मते, अफगाणिस्तानच्या २२३ जिल्ह्यांवर तालिबानचे वर्चस्व आहे. त्याचवेळी ३४ प्रांतांच्या राजधानीपैकी १७ वर तालिबानचा थेट धोका आहे. संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचा वरचष्मा होण्याचा धोका आहे. अर्थात अफगाणिस्तानचे सैनिक तालिबानशी दोन हात करत आहेत. त्याचवेळी अमेरिका आणि अन्य देशांनी देखील अफगाणिस्तानला मदतीसाठी हात पुढे केला आहे.
अफगाणिस्तान सुरक्षा दलाने लश्करगा येथे केलेल्या कारवाईत तालिबान आणि अल कायदाचे ९० हून अधिक दहशतवादी मारले गेले. तसेच १६ जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तान सैनिकांच्या अभियानात तालिबानचा हेलमंद प्रांतातील रेड युनिट कमांडर मावलावी मुबारक हा मारला गेला. मलावीसह ९४ तालिबानी, अल कायदाचे दहशतवादी ठार झाल्याचे मंत्रालयाने सांगितले.
अफगाणिस्तानात गेल्या सहा महिन्यांत १६५९ नागरिक ठार तर ३२५४ जण जखमी झाल्याचे सरकारी सूत्राने म्हटले आहे. मे महिन्यांत हिंसाचाराचे प्रमाण वाढले असून विशेषत: अफगाणिस्तानातून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु झाल्याने नागरी वस्तीवर हल्ले वाढले आहेत. अफगाणिस्तानच्या पूर्वोत्तर प्रांत तखरसह अनेक जिल्ह्यात ताबा मिळवला आहे.