अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिघळली; इतर देश सैन्य पाठवणार!

0
नवी दिल्ली : अफगाणिस्तान मधील परस्थिती चिघळी आहे. अफगाणिस्तानमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा ताबा घेण्यास तालिबानने सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानमधील जवळपास दोन तृतीयांश भागावर तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिघळली असून अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिका अफगाणिस्तानमध्ये तीन हजार सैनिकांना पाठवणार आहे. तर, ब्रिटन आणि कॅनडाने आपले खास प्रशिक्षित कमांडो पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे सैन्य युद्धासाठी पाठवण्यात येणार नाही.
अफगाणिस्तानमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. तालिबानने कंदाहार, हेरात, गझनी शहरावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये तालिबान राजधानी काबूलवर हल्ला करण्याची शक्यता आहे. काबूलमध्ये अमेरिकेसह अनेक देशांची दूतावास कार्यालये आहेत. या दूतावासातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे पुन्हा अमेरिकेत आणण्यासाठी अमेरिकेने तीन हजार सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्लोबल न्यूजच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमधील दूतावास सोडण्याची तयारी कॅनडाने केली आहे. राजनयिकांची वर्गवारी करण्यात आली असून कार्यालयातील दस्ताऐवज नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही दस्ताऐवजे नष्ट केल्यानंतर राजनयिक आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना दूतावासातून काढण्यात येणार आहे. याकामी मदतीसाठी कॅनेडियन स्पेशल ऑपरेशन्स रेजिमेंट (CSOR) आणि ज्वाइंट टास्क फोर्स (JTF2) कमांडो युनिट पाठवण्यात आले आहे.
ब्रिटनदेखील ६०० कमांडो अफगाणिस्तानमध्ये पाठवणार आहे. गुरुवारी याबाबतची माहिती देण्यात आली. अफगाणिस्तानमधून ब्रिटीश नागरीक, कर्मचारी, अधिकारी यांना पुन्हा सुखरुप मायदेशी आणण्यासाठी ६०० कमांडोचे एक पथक पाठवण्यात येणार आहे.
कोणत्याही देशातील दूतावास सोडण्याआधी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) असते. त्यानुसार, दूतावास सोडण्याआधी कोणत्या वस्तू, कागदपत्रे देशात घेऊन जायची आणि कोणत्या वस्तू नष्ट करायच्या याची यादी केली जाते. त्याशिवाय महत्त्वाची कागदपत्रे, हार्डडिस्क यांच्याबाबत निर्णय घेतला जातो. इतर काही कागदपत्रे जाळली जातात अथवा त्यांचे बारीक तुकडे केले जातात.
अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाचे कमांडो काबूलमध्ये असेपर्यंत तालिबान हल्ला करण्याची शक्यता कमी आहे. हे कमांडो प्रशिक्षित असून त्यांच्याकडे घातक शस्त्रे आहेत. तालिबानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता या कमांडोमध्ये आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.