काबूल: अफगाण सैन्याने शरणागती पत्करल्यामुळे तिथे पुन्हा एकदा तालिबान राज येणार हे स्पष्ट झाले आहे. राजधानी काबूलवर तालिबानने नियंत्रण मिळवलं आहे. सध्या प्रत्येक देश अफगाणिस्तातून आपल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय. तर अमेरिकने काबूलमधील हमीर करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात घेतलं आहे. पुढच्या ४८ तासांत अमेरिका अफगाणिस्तानात आपले ६ हजार सैनिक तैनात करणार आहे तसेच काबूलमधील विमानतळाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षही (ATC) ताब्यात घेणार आहे.
आपल्या तसेच मित्र देशांच्या नागरिकांना अफगाणिस्तानातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचललं आहे. अमेरिका अफगाणिस्तानून ऑगस्ट अखेरपर्यंत निघणार हे स्पष्ट होताच, तालिबानने आक्रमक होत एक-एक प्रांत ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ते इतक्या लवकर काबूलपर्यंत पोहोचतील असे वाटले नव्हते. पण अफगाण सैन्याने शरणागती पत्करल्यामुळे चित्रच बदलले.
अफगाणिस्तानात राहणारे हजारो अमेरिकन नागरिक आणि दूतावासात काम करणारे स्थानिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही अमेरिकेत पाठवण्यात येणार आहे, असे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेच्या स्पेशल इमिग्रंट व्हिसासाठी पात्र असलेल्या हजारो अफगाणि नागरिकांना अमेरिकत पाठवण्याची प्रक्रियाही गतीमान करण्यात येणार आहे. मागच्या दोन आठवड्यात दोन हजार अफगाणि नागरिक आधीच अमेरिकेत दाखल झाले आहेत.