काबुल : अफगाणिस्तानच्या राजधानीत अजुनही भारतीय नागरिक अडकले आहेत. भारताकडून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्या ठिकाणी असलेल्या गैरव्यवस्थापनावर ते नाराज आहेत. अशात सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय नागरिक आपला रोष व्यक्त करत आहेत. त्यातील एकाने सांगितले, की आमचे कुणीही ऐकत नाही. फ्लाइट कधी येणार माहिती नाही. कुणी फोन सुद्धा उचलायला तयार नाही. बाहेर पाहा, गोळीबार सुरू आहे.
हे सर्व भारतीय विमानतळावर एका कोपऱ्यात बसून फक्त विमानाची वाट पाहत आहेत. सर्वांचे पासपोर्ट आणि कागदपत्रे सुद्धा तयार आहेत. यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारताकडून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी C17 ग्लोबमास्टर विमान पाठवले जात आहे. 129 भारतीयांना रविवारीच मायदेशी आणले गेले. सोबतच अफगाणिस्तानचे काही खासदार आणि उच्चायुक्त सुद्धा भारतात पोहोचले.
आणखी एका भारतीयाने एक व्हिडिओ जारी केला. त्यानुसार, “माझ्यासोबतच आणखी भारतीय आहेत. आम्ही बाहेर निघू शकत नाही. कारण, बाहेर गोळ्या झाडल्या जात आहेत. येथे चोर आणि लुटारूंची भीती आहे. भारताचे विमान कधी येणार आम्हाला काहीच पत्ता नाही. आम्हाला आधी दुपारी 12.30 ची वेळ देण्यात आली होती. आता दूतावासात कुणी फोन देखील उचलत नाही. आमच्याकडे कसलीही माहिती नाही. विमानतळाबाहेर 4 लाख लोक उभे आहेत. प्लीज आमची मदत करा.”
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी अफगाणिस्तानात अडकलेल्या 200 शिखांसह सर्वच भारतीयांना लवकरात लवकर आणण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी परदेशात अडकलेल्या भारतीयांची तत्काळ व्यवस्था करा असे आवाहन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना केले. तर दुसरीकडे जर्मनी आणि डेनमार्क आपल्या नागरिकांना अफगाणिस्तनातून बाहेर काढण्यासाठी पाकिस्तानची मदत घेत आहेत.