तब्बल 4 कार आणि एक हेलिकॉप्टर भरून पैसे घेऊन पळाले राष्ट्राध्यक्ष
काबुल : अफगाणिस्तानचे अमेरिका समर्थक राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडताना ते आपल्यासोबत तब्बल 4 कार आणि एक हेलिकॉप्टर भर कॅश घेऊन गेले आहेत. काबुल येथील रशियाच्या दूतावासाने सोमवारी हा धक्कादायक दावा केला आहे. रशियाची वृत्तसंस्था RIA ने दूतावासातील सूत्रांचा दाखला देऊन हे वृत्त प्रसिद्ध केले. रोकड इतकी जास्त होती की हेलिकॉप्टर आणि कार कमी पडल्या. यानंतर काही कॅश गनी विमानतळावरच सोडून गेले.
तालिबानने सुद्धा आपल्याला विमानतळावर मोठ्या प्रमाणात रोकड मिळाल्याचा दावा केला होता. तालिबाननुसार ही रक्कम 5 दशलक्ष एवढी होती. पण, त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. आता रशियाच्या दूतावासाने याची पुष्टी केली.
अशरफ गनी आणि उपराष्ट्राध्यक्ष सालेह सुद्धा रविवारीच अफगाणिस्तान सोडून कझाखस्तानला गेल्याचे वृत्त होते. यामध्ये त्यांच्या जवळच्या अधिकारी आणि समर्थकांचा देखील समावेश होता. पण, ते नेमक्या कुठल्या विमानातून पसार झाले किंवा नेमके कुठे आहेत याचा पत्ता अद्याप कुणालाही नाही. काहींच्या मते, ते अमेरिकेला गेले आहेत. पण, ठोस माहिती कुणाकडेच नाही.
दरम्यान, गनी यांनी एक फेसबूक पोस्ट केली. त्यामध्ये अफगाणिस्तानात थांबले असता अधिक रक्तरंजित संघर्ष झाला असता. तोच टाळण्यासाठी आपण देश सोडल्याचे गनी म्हणाले आहेत. सोबतच, तालिबानने देशात शांतता बहाल करावी असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.