मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले. राणेंचा अटकपूर्व जामीन रत्नागिरीतील सत्र न्यायालयाने फेटाळल्या नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
वृत्तवाहिन्याच्या स्थानिक पत्रकारांनी याबाबत माहिती दिलेली आहे. राणेंना अटक करण्यासाठी अनेक ठिकाणच्या पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राणेंना जामीन देण्यास नकार दिला. तांत्रिक मुद्द्यावर हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
नाशिकमध्ये गुन्हा दाखल असताना रत्नागिरीत जामीन अर्ज का, या मुद्द्यावर हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी संगमेश्वरमधील गोळवली गावात पोलीस दाखल झाले. पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतल्याचे समजते. थोड्याच वेळात त्यांच्या अटकेची कारवाई होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आत्तापर्यंत राणेवर तीन ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहे. राणेंना अटक होईल का, हे लवकरच समजेल. आतापर्यंत महाड, रायगड, नाशिक आणि पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादमध्येही गुन्हे दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांविषयी बदनामीकारक वक्तव्य करणे आणि शत्रुभाव निर्माण करण्यासाठीच्या कलमांचा समावेश आहे. नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 505 (2), 153-ब (1) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाडमध्ये भादंवि कलम 153, 189, 504, 505 (2) आणि 506 प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.