पुणे : ‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी (ता. २६) सायंकाळी सव्वासहा वाजण्याचा सुमारास आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या कलिंगापट्टणमपासून उत्तरेकडे २५ किलोमीटर अंतरावर धडकले. आज (ता. २७) ही वादळी प्रणाली महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत आहेत. ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आज (ता. २७) आणि उद्या (ता. २८) जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
चंद्रपूरमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघरसह १७ जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस कोसळू शकतो. सोमवारसाठी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, सोलापूर, उस्मानाबाद आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील तीन तासांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुण्याच्या परिसरातील घाटमाथ्यावरपुण्याच्या परिसरातील घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर येत्या सोमवारी (ता. २७) आणि मंगळवारी (२८) पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिल्याची माहिती हवामान खात्याने दिली. वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ तयार झाले आहे. ते जमिनीला धडकल्यानंतर विदर्भापर्यंत पुढे येईल. मात्र, त्याचा प्रभाव पुढे कोकणापर्यंत जाणवणार असल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.
त्यामुळे पुणे शहरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, पावसाच्या हलक्या सरी पडतील. मात्र, शहराच्या परिसरातील घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरींची शक्यता आहे. तेथे ‘रेड अलर्ट’ दिला आहे. येत्या मंगळवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.