राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांकडून मला संपविण्याचा डाव : पडळकर

0

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात काल (रविवारी) भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यामुळे येथील वाद चिघळला. राष्ट्रवादी-शिवसेनेचा गट आणि पडळकर गटात वाद झाला. यानंतर हाणामारी देखील झाली. या हाणामारीत एका कार्यकर्त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकारानंतर शहरात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. या घटनेवरुन आता गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की, माझा कुठल्याच घटनेशी संबंध नव्हता, शरद पवार आणि पालकमंत्री जयंत पाटील यांचा मला संपविण्याचा कट आहे. मी दिघंचीला चाललो होतो, माझ्यावर अचानक दगड काठ्यांनी भ्याड हल्ला करण्यात आला. हिंमत असेल तर सांगून प्रयत्न करावा, मी सुखरुप आहे, असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी-शिवसेनेचा गट आणि गोपीचंद पडळकर गटातील वादाचे मूळ कारण सांगलीत होत असलेल्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमुळे येथील वातावरण सध्या तापलेलं दिसत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष कंबर कसत आहे. आटपाडी येथे सोसायटी गटातील उमेदवार फोडाफोडीच्या मुद्द्यावरुन पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादी गट आमने-सामने आले आहेत. या दोन्ही गटात चांगलाच वाद चिघळला. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची तोडफोड केली गेली. त्याचबरोबर पडळकर यांच्या ताफ्यामधील काही गाड्याही फोडण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.