अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यामधील संबंध कमालीचे ताणले गेले असून अमेरिकेमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत देणारं वृत्त समोर येत आहे. अमेरिकेच्या राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार बायडेन हे नवीन उपराष्ट्रपती निवडण्याची आणि कमला यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी सोपवण्याची तयारी करत आहेत. अमेरिकन प्रसार माध्यमांनी व्हाइट हाऊसमध्ये सुरु असणाऱ्या या गोंधळाबद्दल वृत्तांकन केलं आहे. सीएनएनने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार वेस्ट विंगच्या प्रमुख कर्मचाऱ्यांनी उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांचं पालन करणं बंद केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पुरेसा वेळ उपलब्ध नसणे हे यामागील मुख्य कारण सांगितंल जात आहे. वेस्ट विंगच्या अधिकारी प्रामुख्याने राष्ट्राध्यक्षांच्या कामाचा पसारा संभाळतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कायदेशीर आणि राजकीय विषयांसंदर्भात हे अधिकारी मदत करतात.
कमला हॅरिस या सध्या तीन डझन माजी आणि सध्या कार्यरत असणारे सहकारी, प्रशासकीय अधिकारी, डेमोक्रॅटिक नेते, सल्लागारांसोबत झालेल्या मुलाखतीमध्ये व्हाइट हाऊसमधील रचनेसंदर्भात भाष्य केलं होतं. हॅरिस यांनी केलेल्या दाव्यानुसार व्हाइट हाऊसमधील अनेक संबंधित लोक यामुळे नाराज आहेत की त्यांना पूर्णपणे तयार केलं जात नाही (माहिती दिली जात नाही) आणि नियुक्त्याही रखडल्या आहेत. अनेकांच्या मनामध्ये डावललं जात असल्याची भावना असल्याचं उप-राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे. हॅरिस यांनी अनेकदा राजकीय निर्णयांबद्दल मी जे करण्यासाठी सक्षम आहे त्यामध्ये मला हवे तसे निर्णय घेता येत नाहीत असे संकेत दिले होते.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना आपल्या कार्यकाळामध्ये पहिल्या सात महिन्यांत प्रचंड लोकप्रियता मिळाली. अर्थात ओबामांइतकी लोकप्रियता त्यांना मिळाली नाही पण ते माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा अनेक पटींनी या बाबतीत पुढे होते. पहिल्यांदा करोनासंदर्भातील मुद्द्यांवरुन लोकांनी बायडेन यांना पाठिंबा दिला. मात्र अचानक करोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने, अफगाणिस्तानमधून माघार घेतल्याने आणि अर्थव्यवस्थेसंदर्भातील गोंधळ होऊ लागल्याने बायडेन यांची लोकप्रियता कमी झाली.
एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान सीएनएनने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार डेमोक्रॅट्स आणि त्यांच्या नेतृत्वाखालील अपक्षांकडून बायडेन यांना सर्वाधिक विरोध होतोय.