चंद्रपुर : चंद्रपुर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यात वाघाने केलेल्या हल्ल्यात महिला वनसंरक्षक ठार झाल्या आहेत. त्या आपल्या अन्य तीन सहकाऱ्यांसह वाघांच्या अस्तित्वाविषयी पहाणी करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर वाघाने हा अचानक हल्ला केला.
स्वाती दुमाने असे या ठार झालेल्या वनसंरक्षक महिलेचे नाव आहे.
सध्या संपुर्ण देशभर व्याघ्र गणना सुरू आहे. ताडोबातील वाघांची संख्या मोजण्याचे काम त्या अंतर्गत सुरू आहे.
त्या मोहीमेसाठी त्या आपल्या सहकार्यांसमवेत सकाळी सातच्या सुमाराला जंगलात गेल्या होत्या. त्यावेळी या पथकाला तेथे रस्त्यावच वाघाने ठाण मांडल्याचे दिसले. हा वाघ तेथुन जाईपर्यंत पथकाने सुमारे अर्धातास वाट पाहिली.
त्यानंतर मात्र त्याला टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाघाने स्वाती यांच्यावर मागून हल्ला केला आणि त्यांना दाट जंगलात ओढून नेले.
त्यानंतर जादा कुमक मागवून त्यांचा शोध घेतला गेला त्यावेळी त्यांचा मतदेहच त्यांच्या नजरेला पडला. या प्रकारानंतर तेथील पायी जाऊन व्याघ्र गणना करण्याचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान दुमणे यांच्या कुटुंबाला नियमाप्रमाणे सर्व आवश्यक ती मदत दिली जात आहे, असे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.