सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे हे पराभूत झाले आहेत. शशिकांत शिंदे यांचा केवळ १ मतांनी पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
पाटणमध्ये शंभुराज देसाई व पाटणकर हे परस्परांचे विरोधक. पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांनी ५८ मते मिळवून गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा पराभव केला.
जावळी सेवा विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा १ मताने धक्कादायक पराभव झाला. तेथे विरोधी ज्ञानदेव रांजणे विजयी झाले आहेत. शशिकांत शिंदे यांना २४ मते मिळाली तर रांजणे यांना २५ मते मिळाली.
सातारा जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होती. त्यापैकी आमदार शिवेंद्रसिंह राजेंसह १० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. रविवारी ११ जागांसाठी मतदान पार पडले होते. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. त्यातील पहिलाच निकाल शशिकांत शिंदे यांचा आला.