लंडन : ब्रिटनमध्ये ओमायक्राँन व्हेरियंटचा पहिला बळी गेल्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशाला इशारा दिला आहे. सध्या देशात मोठ्या संख्येने रुग्ण असून देशात मोठी लाट येत आहे. तिला रोखणे गरजेचे आहे, असे सांगत ही लाट अनाकलनीयरित्या वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा व्हेरियंट एकूण संसर्गाच्या ४० टक्के असल्याने सध्या लसीकरणावर भर दिला आहे.
जॉन्सन म्हणाले, ‘ओमायक्रॉन ची वेगाने पसरणारी लाट रोखण्यासाठी १० वर्षांवरील नागरिकांना डिसेंबर अखेर बुस्टर डोस देण्यावर भर दिला आहे. मागील कटू अनुभव आमच्या लक्षात आहे. संसर्गाचा ग्राफ वेगाने वाढतो. मागील २४ तासांत ओमायक्रॉनचे १२३९ रुग्ण आढळले आहेत. ब्रिटनमध्ये कोविड अलर्टचा स्तर तीनवरून चारवर गेला आहे. सध्या ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण ३१३७ आहेत. एक दिवसापूर्वी १८९८ रुग्ण होते. रुग्णसंख्या वेगाने वाढत असून तेथे स्टेज 4 अलर्ट दिल्याचा अर्थ असा की, लाट वेगाने येत आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ब्रिटनमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. सध्य जगातील ६३ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंट पसरला आहे.
कोरोना व्हायरसच्या नव्या स्वरुपातील ओमायक्रॉनमुळे जागतिक आरोग्य संघटनेबरोबरच सर्वच देशांत चिंतेचे वातावरण आहे. अशात संशोधकांनी नव्या व्हेरियंटमुळे येणाऱ्या भीषण संकटाचा इशारा दिला आहे. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसन आणि दक्षिण आफ्रिकेतील स्टेलनबोश विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले आहे की ओमायक्रॉन ब्रिटनमध्ये हाहाकार उडवेल. जर ओमायक्रॉनविषयी कडक उपाययोजना केल्या नाहीत तर पुढील वर्षी २५ ते ७५ हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो. हा व्हेरियंट तिसऱ्या लाटेतील महामारी आणण्यास कारणीभूत ठरू शकतो.