सोलापूरच्या अधीक्षक व न्यायाधीशांच्या नावाने पैसे मागणाऱ्या दोघांना अटक

0

अहमदनगर : सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे फेसबुकवर फेक अकाउंट बनवून त्या माध्यमातून लोकांना पैसे मागणी करणाऱ्याला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे.तर चक्क न्यायाधीशांच्या नावे बनावट अकाउंट तयार करून पैसे मागणाऱ्यालाही माढा पोलिसांनी पकडले आहे.

देवकरण हनुमानसिंग रावत (२४, रा.फारकिया ता.नसिराबाद जि . अजमेर, राज्य राजस्थान), मोनुकुमार नथुसिंग पाल (२६, रा.पांचलीबुजुर्ग, मेरठ,राज्य उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

जानेवारी २०२१ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील एका न्यायाधीशांच्या नावे फेसबुक फेक अकाउंट तयार करून त्यांचे मित्र, नातेवाईक व ओळखीच्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती.

पैशांची तत्काळ गरज असल्याचे भासवून फोन पे, गुगल पे चे नंबर देऊन पैसे पाठविण्याबाबत सांगितले होते. दोन व्यक्तींनी अनुक्रमे १० हजार व ७ हजार रुपये फोन पे व गुगल पे अकाउंटवर पैसे पाठवले होते.

या फसवणुकीप्रकरणी माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्यांचे जवळचे मित्र, नातेवाईक व ओळखीच्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून फोन पे, गुगल पे अकाउंटवर पैसे पाठविण्याबाबत सांगण्यात आले होते.

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या तपासासाठी दोन पथक तयार करण्यात आले होते.

पोलिसांनी उत्तर प्रदेश व राजस्थान या ठिकाणी जाऊन दोघांना अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, फौजदार गणेश पिंगुवाले , शैलेश खेडकर , सूरज निंबाळकर , पोलीस अंमलदार मनोज भंडारी , मोहन मनसावाले , दत्ता खरात , विशाल टिंगरे , सचिन मसलखांब , सचिन दरदरे , अन्वर अत्तार, अर्जुन केवळे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.