ओमायक्रॉनची लागण प्रत्येकालाच होऊ शकते; बूस्टर डोसही संसर्ग थांबवू शकणार नाही

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतात पुन्हा करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. तर, करोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन ज्यामुळे अनेक देशांमध्ये करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले, त्याचा संसर्गही देशात वाढतोय. त्यामुळे सरकारने खबरदारीची पावले उचलत १५-१८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. शिवाय आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लसीचा बूस्टर देण्याची घोषणा केली. मात्र, हा बूस्टर डोस देखील लोकांना ओमायक्रॉनची लागण होण्यापासून रोखू शकणार नाही, असं एका आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलंय.

आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीमधील वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मुलायल एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले, “करोना हा आता भयानक आजार राहिलेला नाही. नवीन स्ट्रेनचा प्रभाव खूपच कमी आहे आणि खूप कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. ओमायक्रॉन हा एक असा आजार आहे, ज्याचा आपण सामना करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना याची लागण झाल्याचेही कळणार नाही. कदाचित ८० टक्क्यांहून अधिक लोकांना कळणारही नाही की आपल्याला कधी ओमायक्रॉनची लागण झाली,” असं त्यांनी सांगितलं.

कोणत्याही वैद्यकीय समितीने बूस्टर डोसची शिफारस केलेली नाही, असे सांगून डॉ. मुलीयल म्हणाले, की ते या रोगाची नैसर्गिक प्रगती थांबवणार नाहीत. तसेच त्यांनी लक्षणे नसलेल्या बाधितांच्या जवळच्या लोकांच्या करोना चाचणीला विरोध केलाय. त्यांच्यामते या विषाणूचा संसर्ग अवघ्या दोन दिवसांत दुप्पट होत आहे, त्यामुळे करोना चाचणीचा रिझल्ट येईपर्यंत बाधित व्यक्तीमुळे अनेक लोकं संक्रमित झाली असू शकतात. अशा परिस्थितीत चाचणी करण्याचा फायदा होणार नाही आणि त्यामुळे करोनाच्या फैलावात देखील काही फरक पडणार नाही, असं ते म्हणतात.

कडक लॉकडाऊनबाबत ते म्हणाले की, “आपण जास्त काळ घरात कोंडून राहू शकत नाही. असंही ओमायक्रॉनचा प्रभाव डेल्टा प्रकारापेक्षा खूपच सौम्य आहे. शिवाय सुरुवातीला लस देशात येईपर्यंत सुमारे ८५% भारतीयांना संसर्ग झाला होता. अशा परिस्थितीत, लसीचा पहिला डोस हा पहिल्या बूस्टर डोससारखा होता कारण बहुतेक भारतीयांमध्ये नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती होती,” असं त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.