रत्नागिरी : संक्रातीच्या दिवशी घरात एकट्याच असणाऱ्या तीन वृद्ध महिलांचा खून करुन, पुरावा नष्ट करण्याचा हेतूने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करुन, महिलांच्या अंगावरील दागिने चोरून नेण्याचा प्रकरणाचा उलगडा झाला आहे. रत्नागिरी पोलिसांच्या सात पथकांनी आठ दिवसाच्या प्रयत्नानंतर एकाला अटक केली आहे. कर्जबाजारी असल्याने पैश्यांसाठी हे कृत्य केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.
याप्रकरणी रामचंद्र शिंदे (५३, रा. मुंबई) याला पोलिसांनी आज, शनिवारी ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर वनोशी खोत वाडीतील पार्वती परबत पाटणे (९०), सत्यवती परबत पाटणे (८०) व इंदूबाई शांताराम पाटणे (८०) या तीन वयोवृद्ध महिलांचे खून करण्यात आले आहेत. या मृतदेहाच्या अंगावरील दीड लाखाचे दागिने गायब असल्याने दागिन्यांसाठीच या तिघींचा खून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले होते. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा पाेलिसांना अंदाज व्यक्त केला होता. अखेर याप्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत संशयित आरोपीस अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, सहायक पोलिस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, उपविभागीय अधिकारी शशिकीरण काशीद, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहायक निरीक्षक मनोज भोसले, नितीन ढेरे, प्रवीण स्वामी, रत्नदीप साळोखे, सुजित गडदे, उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, निनाद कांबळे, शीतल पाटील, विनायक माने आणि त्यांच्या पथकाने केली आहे.