औरंगाबाद : अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा अखेर क्रांतीचौकात विराजमान झाला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषाने पूर्ण परिसर दणाणून गेला होता.
मागील 40 तासंपासून पुतळा बसवण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. शेवटी क्रेन बदलून हा पुतळा बसवला गेला. शहरातील मुख्यरस्ता असलेल्या क्रांती चौकात वाहतूक खोळंबा होऊ नये याकरिता उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र हा उड्डाणपूल तयार झाल्यानंतरशिवाजी महाराजांचा पुतळा पुलाखालून येत होता. याच कारणामुळे पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी झाली आणि मागील दोनवर्षांपासून क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढविण्याचं काम सुरू झालं.
तर पुण्यात पुतळा तयार करण्याचं कामही सुरू होतं. हा पुतळा एका मोठ्या ट्रेलरमध्ये औरंगाबादमध्ये आणला. 25 फूट उंच आणितब्बल 8 टन वजन असलेला हा पुतळा क्रांती चौकात विराजमान झाला आहे.
औरंगाबादच्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना ही 1982 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्रीवसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांचा हा पुतळा तिथे बसवण्यात आला आहे.