देवस्थानच्या वादातून गोळ्या झाडून खून; कोणताही पुरावा नसताना आरोपी जेरबंद

0

रत्नागिरी : कोणताही पुरावा नसलेल्या, राजापूर, केळवडे जंगलात गावठी पिस्तूलातुन गोळ्या झाडून केलेल्या खुनाचा उलगडा करण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून गावातील देवस्थानच्या वादातून खून केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.

दिपक उर्फ बाबू राजाराम गुरव (रा. वरचीवाडी, केळवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर संजय उर्फ बंड्या महादेव मुगे (रा. वरचीवाडी, केळवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; राजापूर तालुक्यातील केळवडे गावानजीक असलेल्या जंगलात एकजण जखमी आवस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालय नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान त्याच्या डोक्यात बंदुकीची गोळी लागली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा घातपाताचा प्रकार असल्याने पोलीस अधीक्षक मोहितकुमात गर्ग यांनी तपासासाठी पाच पथके तयार केली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला. मात्र त्या ठिकाणी काहीच पुरावा सापडला नाही. जंगल असल्याने तपासात अडचणी निर्माण होत होत्या. पोलिसांनी गावातील व इतर गावातील लोकांशी विश्वासात घेऊन चौकशी सुरु केली, मात्र काहीच धागेदोरे हाती लागत नव्हते. दरम्यान मयत दीपक गुरवच्या गावातील एकाकडे बंदूक असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी संजयला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अपर अधीक्षक जयश्री देसाई, सहायक अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी श्रीनिवास साळोखे, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, सहायक निरीक्षक मधुकर मोळे, आबासाहेब पाटील, दिनकर सूर्य, प्रवीण स्वामी, मनोज भोसले, उपनिरीक्षक विनायक नरवणे या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.