‘सिंह कधीही गिधाडाच्या धमकीला घाबरत नाही’

0

पणजी : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला होता. यावरून महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले आहे. गोव्यात पत्रकार परिषद घेताना त्यांनी संजय राऊतांच्या लेटरबॉम्बवरून जोरदार घणाघात केला. फडणवीस म्हणाले की, ‘सिंह कधीही गिधाडाच्या धमकीला घाबरत नाही.’

 

दरम्यान शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रावरून सध्या मोठा राजकीय वाद सुरू झाला आहे. संजय राऊतांचं हे पत्र सध्या चर्चेत असून त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या इशा-यावरून देखील बरेच तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

‘‘आम्ही जर तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही. देवेंद्र फडणवीसांना माहितीये मी काय बोलतोय ते’’, असे राऊत म्हणाले आहेत. संजय राऊतांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, सकाळी येऊन सर्वांचे मनोरंजन करायचे काम ते करतात. आता संजय राऊत जे प्रयत्न करत आहेत, ते त्यांचे सगळे प्रयत्न व्हिक्टिम कार्ड खेळणे एवढेच आहे. राऊतांचे जे म्हणणे आहे ते त्यांनी न्यायालयात मांडावे, त्यांच्या अशा वक्तव्यांना महत्त्व देण्याची गरज नाही.

 

मोदींच्या सरकारमध्ये कोणालाही व्हिक्टिम केले जात नाही. संजय राऊतांकडून व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. संजय राऊत संपादक आहेत आणि त्यांना हेडिंग कसे करायचे हे माहिती आहे असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.