साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 39 जणांना फाशी तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा

0

अहमदाबाद : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने  48 दोषी पैकी 39 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे तर, 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फाशीची शिक्षा झालेल्यांपैकी तीन जण पुण्यातील आहेत. 2008 साली अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी स्फोटात 56 जणांचा मृत्यू व 200 जण जखमी झाले होते.

आसिफ बसरूद्दीन शेख (रा. कोंढवा), मोहम्मद अकबर चौधरी (रा. मिठा नगर, कोंढवा), फजल ए रहेमान खान (रा. पुणे) या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, आणिक सय्यद (रा. पुणे) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

तसेच, कॅम्प परिसर पुण्यातील सॉफ्टवेअर अभियंता मोहम्मद असगर पीरभॉय याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पीरभॉय वरती इंडियन मुजाहिद्दीन या दहशदवादी संघटनेच्या मिडिया विंगचा नेता असल्याचा आरोप होता. याशिवाय मुबिन कादर शेख (रा. कोंढवा) याची देखील निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

26 जुलै 2008 रोजी गुजरातच्या अहमदाबाद शहरात 70 मिनिटांमध्ये एका पाठोपाठ 21 स्फोट झाले होते. इंडियन मुजाहिद्दीन आणि हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी नावाच्या कट्टरतावादी संघटनांनी याची जबाबदारी घेतली होती. जवळपास 13 वर्षे सुरु असलेल्या या खटल्यात 1,163 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. पोलीस आणि कायदेशीर यंत्रणांनी कोर्टासमोर 6 हजारांहून अधिक पुरावे सादर केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.