मुंबई : महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
स्वाभिमानासाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि हक्कांसाठी जर कोणी दुश्मन अंगावर आला तर त्यांची बोटं छाटली जातील. 25 वर्षे लढूनही औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये मृत्यु पत्कारावा लागला. हा शिवचरित्राचा इतिहास देशाला आणि महाराष्ट्राला माहित आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शिवसेनेची स्थापना केली आहे. शिवसेनेच्या दुश्मनांनी हे नीट समजून घेतलं पाहिजे असल्याचं संजय राऊत म्हणाले.
यावेळी बोलताना राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबतही माहिती दिली. केंद्रीय तपास यंत्रणांनी ममता बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. महाराष्ट्रातही हे सुरू आहे मात्र दिल्लीच्या सत्तेपुढे झुकणार नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या यावर बोलताना महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा स्वभाव एकच असल्याचं राऊत म्हणाले.
दरम्यान, छत्रपतींचं स्मरण महाराष्ट्राला रोज होत असतं. महाराष्ट्राच्या दुश्मनांना एकच धडा चारशे वर्षापुर्वी महाराजांनी शिकवला. महाराष्ट्र हा दुश्मनांपुढे झुकणार नाही, वाकणार नाही, महाराष्ट्र हा लढत राहील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.