सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी संपकरी एसटी कामगारांनी आंदोलन केले आहे. यावेळी चप्पल, दगडफेकी देखील करण्यात आली. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांत आरोपांच्या फैरी देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला, ‘जे केलंय ते इथंच फेडावं लागेल’ अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पलटवार केला आहे.
त्यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ”उदयनराजे भोसले काय बोलतात याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. मुळात ते संध्याकाळी बोलले आहेत, ते कोणत्या परिस्थितीत बोलले आहेत, हे तपासले पाहिजे आणि नंतर त्यावर मी बोलेन,” असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
पुढे जंयत पाटील म्हणाले, ”एसटी कर्मचाऱ्यांना गेली 40 वर्ष वेळोवेळी मदत केलीय, आधार दिला त्यामुळे खरा एसटी कर्मचारी पवार साहेबांच्या घरापर्यंत अशा पद्धतीने जाणार नाही. हे मुद्दामपणे आणि जाणीवपूर्वक केलेलं काम आहे. जे तिथे आले ते एसटी कर्मचारी होते का, ते कोणत्या परिस्थितीत होते हे सत्य बाहेर येईल,” असं ते म्हणाले.