सोलापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली होती. त्यांचा अडचणीत वाढच होत आहे. त्यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाचे अनुषंगाने न्यायालयाच्या निकालाविरुद्ध नापसंती दर्शवत निर्णयावर शंका घेत, न्यायाधीशांविषयी अवमानकारक भाषा वापरल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत योगेश नागनाथ पवार (३८, रा. धुम्मा वस्ती, लक्ष्मी पेठ यांनी फिर्याद दिली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप तालुका अध्यक्ष स्वप्नील गलधर यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती.”सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. तसेच मराठा समाजाला अत्याचारी समाज असे संबोधित केलं. मराठा आरक्षण संदर्भात वेळोवेळी त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला. त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी सदावर्ते यांनी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या”, अशी तक्रार देण्यात आली होती.
यापूर्वी सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सदावर्ते यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्याविषय आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या संदर्भात साताऱ्यातील शहर पोलिस ठाण्यात २०२० मध्ये गुन्हा दाखल झालेला होता. याप्रकरणी सातारा पोलिसांनी त्यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले होते.
गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी अॅड जयश्री पाटील यांच्यासह अन्य २ जणांविरुद्ध अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून ३०० ते ४०० रुपये गोळा करून तब्बल ७४ हजार कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार जानेवारी महिन्यातच मालोकार यांनी अकोट पोलिसांकडे नोंदवली होती.