‘राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील बडा नेता पराभूत होणार’ : चंद्रकांत पाटील

0

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप आमने–सामने आले आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. ‘राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येणार हे नक्की आहे. मात्र या निवडणुकीमध्ये मोठा नेता पराभूत होणार असल्याचं,’ भाकीत त्यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात मोठी चर्चा रंगली आहे.

“राज्यसभा निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. त्यासाठी घोडेबाजार होणार नाही. मात्र राज्यातील एक बडा नेता पराभूत होईल.’ आमचे नियोजन पक्के आहे. वाटल्यास महाविकास आघाडीने आमच्यासोबत चर्चा करून त्यांच्यातील एक उमेदवार मागे घ्यावा. महाविकास आघाडीचे सर्व नेते भाजपवरच टीका करतात,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “विरोधकांना झोपेत सुद्धा भाजपच दिसतो. हे तिन्ही पक्ष एकमेकांशी खूप भांडतील; मात्र ते सरकार पडू देणार नाहीत. कारण त्यांना हे पक्क माहिती आहे की सरकार पडल्यावर पुन्हा भाजपच सत्तेत येणार आहे. ज्यावेळी आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, त्या वेळी सगळा हिशेब चुकता करू,” असं देखील ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.