तब्बल दीड लाखांची लाच; ‘एसीबी’चा छापा

0

लातुर : निलंगा तालुक्यात अवैध वाळूचा उपसा करुन त्याची अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. यावर कारवाई करण्याऐवजी वाळु माफियांशी हातमिळवणी करत दीड लाखाची लाच घेणाऱ्या निलंगा येथील तहसीलदाराला आणि खासगी व्यक्तीला लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

तहसीलदार गणेश दिगंबरराव जाधव आणि खासगी व्यक्ती रमेश गुंडेराव मोगरगे यांना लातुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई तहसीदार यांच्या घरासमोर करण्यात आली. या कारवाईमुळे तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे.

याबाबत 40 वर्षाच्या व्यक्तीने लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. त्यानुसार पथकाने 26, 28, 30 मे आणि 31 मे रोजी पडताळणी केली होती. तक्रारदार यांचे तीन ट्रकमधून वाळूची वाहतूक करण्यासाठी व कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी प्रति ट्रक तीस हजारांची मागणी तहसीलदार गणेश जाधव यांनी केली होती. त्यानूसार मागील तीन महिन्याचे एकूण 1 लाख 80 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले होते.

अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळीमध्ये तक्रारदार यांच्याकडे वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी व वाळूच्या ट्रकवर यापुढे कारवाई न करण्यासाठी प्रति ट्रक 30 हजार या प्रमाणे दोन ट्रकचे 60 हजार महिना या प्रमाणे तीन महिन्याचे 1 लाख 80 हजार रुपये तहसीलदार गणेश जाधव यांनी मध्यस्थामार्फत मागितले होते.

तडजोडीनंतर दीड लाख रुपये रक्कम खासगी व्यक्ती रमेश मोगरगे याच्याकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे शनिवारी (दि.4) रमेश मोगरगे याने निलंगा येथे तहसीलदार गणेश जाधव यांच्या घरासमोरच लाचेची रक्कम दीड लाख रुपये पंचासमक्ष घेतली. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोन्ही आरोपींना पकडले. पुढील तपास पोलीस उप अधीक्षक पंडीत रेजितवाड करीत आहेत.

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.