अक्कलकोट- गाणगापूर रस्त्यावर भीषण अपघात; मारुंजी येथील नवरदेवासह तिघांचा मृत्यू

0

पिंपरी : कार आणि ट्रकचा भीषण अपघातात हिंजवडी-मारुंजी परिसरातील तीन तरुणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका नवरदेवाचा समावेश असून त्याच्या लग्नाची पत्रिका मंदिरात ठेवण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. अक्कलकोट- गाणगापूर रस्त्यावर बिंजगेर येथे हा अपघात झाला.

दिपक सुभाष बुचडे (२९, रा. मारुंजी), आकाश ज्ञानेश्वर साखरे (२८, रा. हिंजवडी), आशुतोष संतोष माने (२३, रा. हिंजवडी) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी दीपक यांचे चुलत भाऊ चंद्रकांत राघुजी बुचडे (४१, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी अक्कलकोट (दक्षिण) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात ट्रक (ट्रेलर) चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; मृत दीपक बुचडे याचा १८ जून रोजी लग्नसोहळा पार पडणार होता. त्यासाठी लग्न पत्रिका छापण्यात आल्या होत्या. देवाच्या दारात पत्रिका ठेवण्यासाठी तिघेजण बुधवारी सकाळी तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोटला निघाले होते. तुळजापूर येथे पत्रिका ठेवल्यानंतर आम्ही आता गाणगापूरच्या दिशेने जात असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर, साडे अकराच्या सुमारास अक्कलकोट पोलिसांनी फोन करून दीपक यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती दिली.

चंद्रकांत साखरे यांनी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता तिघांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेमुळे हिंजवडीसह मारुंजी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.