सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एक हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. रिक्षाचालकावर कारवाई न करण्यासाठी त्याने लाच मागितली होती. याप्रकरणी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर कारवाई केली आहे. रवीशंकर चव्हाण असं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर झालेल्या कारवाईमुळे सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
एका वडाप रिक्षाचालकाकडे कारवाई न करण्यासाठी रवी चव्हाण यांनी 1 हजार रुपये लाचेची मागणी 10 जून रोजी केली होती. त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने लाचलुचपत विभागाकडे याबाबतची तक्रार नोंदवली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर 15 जून रोजी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या बाहेर सापळा रचून रिक्षाचालकाकडून 1 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रवीशंकर चव्हाण यांना रंगेहाथ पकडले आहे.
दरम्यान, याप्रकरणी रवीशंकर चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती सांगलीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.