खळबळजनक! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या

0

सांगली :  सांगली जिल्हा एका घटनेमुळे चांगलाच हादरला आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु, घटनेबाबत कळताच मिरज पोलिसांनी तात्काळ धाव घेतली असून याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगरमधील डाॅ. माणिक यल्लाप्पा वनमोरे आणि पोपट यल्लपा वनमोरे या दोन सख्या भावांच्या कुटुंबातील 9 जणांनी सामुहिकरीत्या आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. विषारी औषध पिऊन कुटुंबातील सदस्यांनी जीवन संपवल्याचा अंदाज प्राथमिक तपासातून व्यक्त केला जात आहे. सामुहिक आत्महत्येच्या या घटनेने सांगली जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या कुटुंबापैकी एक कुटुंब पशुवैद्यकीय डाॅक्टरांचे होते. कर्मचाऱ्यांनी डाॅक्टरांशी फोनवरून बराच वेळ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारचे उत्तर मिळाले नाही. ग्रामस्थांनी सुद्धा वारंवार फोन करून सुद्धा कोणीच फोन उचलला नाही. शिवाय सकाळी उशीरापर्यंत घराचा दरवाजा बंदच असल्याचे आढळून आले. तथापी, संशय आणखी बळावल्याने दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी, ग्रामस्थांनी डाॅक्टरांच्या घराकडे धाव घेतली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. हाती आलेल्या माहितीनुसार डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांनी आत्महत्या केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.