सांगली : सांगली जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबातील नऊ जणांच्या मृत्यूच्या तपासात एक तांत्रिक आणि त्याच्या ड्रायव्हरने कथितपणे विष देऊन खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हि हत्या गुप्तधनाच्या लोभातून केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे समोर आले होते. ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतुन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल 25 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. परंतु, सखोल तपासात हि आत्महत्या नसून हत्याकांड असल्याचे समोर आले आहे. या दोन भावांपैकी एक शिक्षक आणि दुसरा पशुवैद्य होता.
पोलिसांनी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान (48, रा. सर्वदेनगर सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (39, रा. वसंतविहार ध्यानेश्वरी प्लॉट सोलापूर) यांना अटक केली आहे. पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) मनोज कुमार लोहिया म्हणाले, “आम्ही हत्येप्रकरणी तांत्रिक आणि त्याच्या ड्रायव्हरला अटक केली आहे. या दोघांनी विष प्राशन करून कुटुंबातील नऊ जणांचा जीव घेतल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस अधिकार्यानी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.